
मुंबई : केंद्रीय परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात एक नवीन पॉलिसी समोर आणणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील टोलनाके बंद व्हावेत, याकरिता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे.
दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत गडकरी म्हणाले की, “टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल की, टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. ही पॉलिसी राष्ट्रीय महामार्गांसाठी असणार आहे. पुढच्या दोन वर्षांच्या आत इंडियन रोड इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवे हे अमेरिकेपेक्षा चांगले होतील.”
“सॅटेलाइट बेस फ्री टोलिंग सिस्टिम केंद्र सरकार तयार करत आहे. त्यामुळे टोलनाक्यांची गरज भासणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल भरला जाईल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होईल
“मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करताना खूप अडचणी आल्या. या वर्षीच्या जूनपर्यंत हा बहुप्रतीक्षित महामार्ग १०० टक्के पूर्ण होणार. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. जमिनीचे संपादन आणि जमीनमालकांना द्यावा लागणारा मोबदला यात आमची पुरती वाट लागली असली तरी आता तोडगा निघाला आहे,” असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.