येत्या ४ ते ६ महिन्यांत पालखी मार्ग पूर्ण होणार; पालखी महामार्गाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, येत्या ४ ते ६ महिन्यांत हे दोन्ही आधुनिक मार्ग पूर्णपणे वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
येत्या ४ ते ६ महिन्यांत पालखी मार्ग पूर्ण होणार; पालखी महामार्गाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
येत्या ४ ते ६ महिन्यांत पालखी मार्ग पूर्ण होणार; पालखी महामार्गाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण(संग्रहित छायाचित्र)
Published on

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, येत्या ४ ते ६ महिन्यांत हे दोन्ही आधुनिक मार्ग पूर्णपणे वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. फलटण येथे पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या महामार्गांच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देताना गडकरी म्हणाले की, २३४ किलोमीटर लांबीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ७,६२५ कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. मोहळ ते हडपसर या टप्प्यांमध्ये विभागलेल्या या कामापैकी दिवे घाट ते हडपसर या भागात ६५ टक्के, तर धरमपुरी ते लोणंद या भागात ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेषतः दिवे घाटातील १७ हेक्टर वनविभागाच्या जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून तेथे डोंगराचे उत्खनन करून चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे.

१३० किलोमीटर लांबीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ४,४१६ कोटी रुपये खर्चाचा असून, त्यातील पाटस ते बारामती हा टप्पा पूर्ण झाला आहे, तर इंदापूर ते तोंडले आणि बारामती ते इंदापूर या टप्प्यांचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. जेजुरी येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी २५० कोटी रुपयांचा २ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, फलटण शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. तोंडले येथे दोन्ही पालखी मार्ग एकत्र येतात, त्या ठिकाणी १०० कोटी रुपयांचा भव्य उड्डाणपूल उभारला जाणार आहे. तसेच टेंभुर्णी-पंढरपूर या ४८ किलोमीटरच्या मार्गासाठी ९५० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यातील कनेक्टिव्हिटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात मुंबई ते बंगळुरू प्रवास अवघ्या साडेपाच तासांत, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत पूर्ण होईल. तसेच पुणे ते नागपूर साडेचार तासांत गाठता येईल. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-कर्नूल या नव्या कॉरिडॉरमुळे चेन्नई ते दिल्ली अंतर ३२० किलोमीटरने कमी होईल आणि पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचा ताण ५० टक्क्यांनी घटेल.

शेतकरी आता केवळ अन्नदाता नसून इथेनॉल, हायड्रोजन आणि बायो-डांबर निर्मितीच्या माध्यमातून ऊर्जादाता आणि डांबरदाता होणार आहे. पर्यायी इंधनामुळे देशाचा २२ लाख कोटी रुपयांचा आयातीवरील खर्च वाचेल. कामाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. निकृष्ट काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकले जाईल.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

स्वतंत्र ‘वारकरी लेन’

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या महामार्गांवर साडेतीन मीटरची स्वतंत्र ‘वारकरी लेन’ ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे पायी चालणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक लिफ्टसह आधुनिक फूटओव्हर ब्रिज उभारण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या. या पुलांवरून दुचाकी आणि तीनचाकी वाहनेही नेता येणार आहेत.

४६ खड्ड्यांचे रूपांतर तलावांमध्ये

या महामार्गांच्या बांधकामात तांत्रिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मलेशियातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुलांच्या दोन खांबांमधील अंतर १२० मीटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. या बांधकामात पोलादी सळ्यांऐवजी ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट’चा वापर करण्यात आला असून, ते लोखंडापेक्षा चौपट मजबूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी महामार्गाच्या कडेला ४० हजार झाडे लावण्यात आली असून, त्यात ‘ज्ञानेश्वरी’मध्ये उल्लेख असलेल्या वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच रस्त्यासाठी लागणारी माती काढताना तयार झालेल्या ४६ खड्ड्यांचे रूपांतर तलावांमध्ये करून मोठी जलसाठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in