राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना मुदतवाढ

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर यांनी १ जानेवारी २०२४ रोजी मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. करीर यांना केवळ तीन महिन्यांचा काळ मिळाला. ३१ मार्च रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत.
राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना मुदतवाढ

मुंबई : राज्याचे सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

रिक्त होणाऱ्या मुख्य सचिवपदावर ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांच्याबरोबरच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्‍य सचिव राजेश कुमार मीना आणि नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेले इक्बाल सिंह चहल यांची नावे पाठविण्यात आली होती. सुजाता सौनिक या ज्येष्ठ असल्याने त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता होती. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असते तर सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या असत्या. मात्र आता नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर यांनी १ जानेवारी २०२४ रोजी मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. करीर यांना केवळ तीन महिन्यांचा काळ मिळाला. ३१ मार्च रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. या रिक्त होणाऱ्या पदासाठी राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांच्या नावाची शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. ज्येष्ठतेमध्ये त्याच वरिष्ठ असल्याने त्यांचे नाव सर्वात पुढे होते. मात्र, निवडणूक आयोगाने एकाच अधिकाऱ्याच्या नावाला आक्षेप घेत, किमान तीन अधिकाऱ्यांची नावे पाठविण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार राज्य सरकारने मुख्य सचिवपदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक यांच्याबरोबरच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीना आणि नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेले इक्बालसिंह चहल यांच्या नावाचा प्रस्ताव बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.

logo
marathi.freepressjournal.in