ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय निवडणुका नकोत,धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची ठाम भुमिका

ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे,
ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय निवडणुका नकोत,धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची ठाम भुमिका

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने कमी पाऊस असलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.

“ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे, त्यामुळे राज्यातील जाहीर ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. नवीन सरकारने तातडीने याबाबत कार्यवाही केली पाहिजे,” अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली आहे. दुसरीकडे, “काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावले उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे",” असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. “महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. ही लढाई अंतिम टप्प्यात असताना निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये अशी आमची विनंती आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली आहे. भाजपप्रणीत नवीन सरकारने तत्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in