मुंबई : पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील क्रमांक ६६ वर १६ टनापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता भक्तांची गर्दीसोय होऊ नये यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर १६ टनापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी असली तरी दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड गॅस, मेडिकल, ऑक्सिजन, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मात्र गणेशोत्सव दरम्यान परवानगी असेल.
येत्या ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबईसह राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणपतीनिमित्ताने कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची संख्याही मोठी असते. एसटी, खासगी आराम गाड्या, मोटारी हजाराेंच्या संख्येने कोकणात जात असतात. वाहतूककाेंडी हाेऊ नये म्हणून सरकारने जड वाहनांना बंदी घातली आहे.
या दरम्यान असेल वाहतूक बंदी
५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासासाठी १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत व अनंत चतुर्दशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासासाठी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
या वाहनांसाठी वाहतूक प्रतिबंध
या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११ वाजेपासून ते १२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ८ वाजता आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत नियमित वाहतुकीस परवानगी राहील.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी
वाहतुकीसाठीचे निर्बंध हे दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसतील. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्याची ने– आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू नसेल. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा आणि महामार्गांचा विचार करुन पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात – निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे. - राजेंद्र होळकर, सहसचिव.