"ओबीसीं नेत्यांशिवाय अन्य नेत्यांना गाव प्रवेश बंदी..." 'त्या' बॅनरमुळं नवा वाद, बॅनर हटवले

ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यानं गावात प्रवेश करू नये. अन्यथा मोठा अपमान केला जाईल," असा उल्लेख बॅनरवर होता.
"ओबीसीं नेत्यांशिवाय अन्य नेत्यांना गाव प्रवेश बंदी..." 'त्या' बॅनरमुळं नवा वाद, बॅनर हटवले

जालना : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन उभं केलं. त्याचवेळी ओसीबी आरक्षण बचाव'साठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सध्याच्या घडीला मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन १३ जुलैपर्यंत स्थगित केलंय, तर लक्ष्मण हाकेंनीही आपलं उपोषण थांबवलं आहे. तरीही मराठा विरूद्ध ओबीसींमध्ये वातावरण तापलेलंच आहे. अशातच आता काही गावांमध्ये ओबीसी नेते सोडून इतर नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, अशा आशयाचे बॅनर लावल्यानं नवा वाद सुरु झाला आहे.

ओबीसी नेत्यांशिवाय कुणीही गावात प्रवेश करू नये, अन्यथा...

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक गावांमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणानंतर काही गावांमध्ये गावबंदीचे पोस्टर लावल्याचं समोर आलं आहे. परंतु या गावांमध्ये ओबीसी नेत्यांना सोडून इतर सर्व नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात आणि परभणीच्या मोहाडी, तालुका जिंतूर गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर "एकच पर्व, ओबीसी सर्व...ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यानं गावात प्रवेश करू नये. अन्यथा मोठा अपमान केला जाईल," असा उल्लेख होता.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध केल्यानं तोंडाला काळं फासलं-

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळं डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली. माध्यमांमधील माहितीनुसार, मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. त्यामुळं रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. विशेष म्हणजे या संघटनेनं रमेश तारख यांचा आधी सत्कार केला, त्यानंतर त्यांना काळं फासलं. संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं तणाव वाढण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये शांतता रॅलीचे आयोजन-

बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी बीड येथे काल सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुकानिहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यासाठी बीड जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. ही रॅली 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग नोंदवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in