माता-बाल पोषण आहार रखडला; मातृवंदना योजनेचे अनुदान मिळण्याची ‘नो गॅरंटी’

मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाइट‌्सच्या नादुरुस्तीची चर्चा झाली असून, देशभरात अशीच परिस्थिती असल्याचे सांगून संबंधित खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपासून अनुदान मिळण्याची नो गॅरंटी असल्यासारखे मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.
माता-बाल पोषण आहार रखडला; मातृवंदना योजनेचे अनुदान मिळण्याची ‘नो गॅरंटी’

शैलेश पालकर/पोलादपूर

तालुक्यातील माता-बाल पोषण आहार गेल्या चार महिन्यांपासून रखडला असून, लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अशी माहिती पोलादपूर शहरातील तसेच तालुक्यातील अंगणवाड्यांतून देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाइट‌्सच्या नादुरुस्तीची चर्चा झाली असून, देशभरात अशीच परिस्थिती असल्याचे सांगून संबंधित खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपासून अनुदान मिळण्याची नो गॅरंटी असल्यासारखे मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.

देशातील दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात १ जानेवारी २०१७पासून तीन टप्प्यात ५ हजार रुपये रकमेचा लाभ थेट बँक अथवा पोस्टाच्या खात्यात जमा केला जाण्याचा शासननिर्णय ७ डिसेंबर २०१७ पासून अंमलात येऊ लागला. राज्यात सरकारी रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेने नोंद केल्यानंतर वेबपोर्टलवरून आशासेविका अथवा फिड फंक्शनरी यांनी सदर महिलेची माहिती अपलोड करायची आहे, असे सांगण्यात आले.

पोलादपूर शहरातील गर्भवती आणि प्रसुती झालेल्या महिलांसह तालुक्यातील अनेक गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांची माहिती या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात वेबपोर्टलवर अनेक अडचणी आल्याने दुसऱ्या वेबसाइटवरून माहिती अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात पोलादपूर शहर हे पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील धामणदिवी येथील आरोग्य उपकेंद्राच्या अख्त्यारीमध्ये येत असल्याची माहिती देऊन संबंधित ऑपरेटरकडे चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यादरम्यान, पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय पोलादपूर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमागील जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आले असून, याठिकाणी महिला लाभार्थ्यांची माहिती नव्याने अपलोड केली जात असल्याचे सांगण्यात आले. २०२०पासून आतापर्यंत अनेक महिलांना उडवाउडवीची, वेबपोर्टलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पुन्हा माहिती अपलोड करावी लागल्याची तसेच तुमचे बँक खाते तपासून बघा, अशी मोघम उत्तरे देण्यात आली आहेत. या कालावधीमध्ये लाभार्थी महिलांना आशा सेविका असलेल्या महिलांकडूनच अशी उत्तरे देण्यास भाग पाडणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजतागायत या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा डाटा अपलोड होऊन लाभार्थी महिलांना देय रक्कम खात्यात जमा झाले आहे अथवा कसे, याबाबत खातरजमा केलेली दिसून येत नाही.

सरकारी काम, सहा महिने थांब!

पोलादपूर शहर आणि तालुक्यातील माता-बाल पोषण आहाराबाबत शहरातील पोषण आहार नगरविकास खात्यामार्फत आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील माता-बाल पोषण आहार पूर्वीप्रमाणेच महिला व बालकल्याण विभागाकडून मिळत असल्याचे सांगण्यात येते; मात्र, चार महिन्यांचा एकत्रित पोषण आहार मिळेल. असे सांगणाऱ्या या यंत्रणेला सध्या लोकसभा निवडणुकीनंतर माता-बाल पोषण आहार एकत्रितपणे मिळेल, असे सांगावे लागत असल्याने 'सरकारी काम, सहा महिने थांब'चा अनुभव घेणाऱ्या माता-बालकांची भूक किती महिने आळविता येणार, याची शाश्वती दिसून येत नाही.

सरकारी अधिकारी गप्प

मंत्री ना. अदिती तटकरे यांनी महिलांच्या प्रश्नी तातडीने लक्ष घातल्याने नजिकच्या काळामध्ये मातांना नवीन जीआरनुसार मिळणारा लाभ तसेच जुन्या जीआरनुसार मिळणारा लाभ खोळंबलेली परिस्थिती दूर होण्यास मदत होईल, असे पोलादपूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र, या घटनेस एक वर्ष झाल्यानंतर आता अधिकारी मौन बाळगून आहेत. काही महिला कर्मचारी व अंगणवाडीसेविका तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर्स या देखील या योजनेच्या लाभार्थी असून, आमचेपण आले नाही पहिल्या बालकाचे, तर दुसरे अपत्य जन्माला येऊन तरी मिळतील की नाही, सांगता येत नसल्याचे प्रतीक्षेतील लाभार्थी महिलांना सांगत असल्याने या योजनेची नो गॅरंटी असल्याचे उघड झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in