"काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही, ती बातमी चुकीची"; पवार गटाच्या बड्या नेत्याचं स्पष्टीकरण

ज्यांना पवार साहेब यांची भीती आहे ते अफवा पसरवून मोकळे झालेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे
"काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही, ती बातमी चुकीची"; पवार गटाच्या बड्या नेत्याचं स्पष्टीकरण
Published on

"दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या नावाने जनतेत जाईल आणि निवडणूक लढवेल", असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशात जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी सकाळपासून शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याबाबत पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी, तशी चर्चा सुरू असून यासंबंधीचा निर्णय लवकरच सर्वांना कळेल, असे विधान केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र, जगताप यांनी बांदल यांचा दावा फेटाळत, बांदल यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी काही संबध नाही. ते आमच्या गटाचे नेते नाहीत, असंही स्पष्ट केलं आहे. पुण्यात आज सकाळी शरद पवार गटाची बैठक झाली. या बैठकीनंतर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"आजच्या बैठकीत पक्षनाव आणि चिन्हाबाबत चर्चा झाली. दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्णय करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या नावाने जनतेत जाईल आणि निवडणूक लढवेल. शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाव आणि चिन्ह दिलं तर आम्ही आमची स्वतंत्र भूमिका घेऊन विधानसभा आणि लोकसभेत जनतेसमोर जाणार आहोत. सोशल मीडिया, महाराष्ट्रातील जनता आणि तरुण पिढीवर माझा एवढा विश्वास आहे की कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी ५९ मिनिटांच्या आत संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हे चिन्ह पोहोचेल. आमच्यादृष्टीने शरद पवार हेच नाव आणि चिन्ह, त्यामुळे कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी चालेल. ज्यांना पवार साहेब यांची भीती आहे ते अफवा पसरवून मोकळे झालेत", असे ते म्हणाले. शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीही, या बैठकीत विलिनीकरणाचा विषय झालेला नाही. ही बातमी चुकीची आहे, असे सांगितले.

कशी सुरू झाली होती चर्चा? -

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करुन काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा काँग्रेस हायकमांडने पवारांसमोर प्रस्ताव ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यात भर म्हणजे बुधवारी सकाळी बांदल यांनीही त्याला दुजोरा दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in