आमदारांसाठी आता मोठ्या बॅग नाही! राज्यसरकारने निर्णय केला रद्द
रविकिरण देशमुख / मुंबई
राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ८८६ लगेज ट्रॉली बॅग खरेदी करण्याचा निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे. आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांना या बॅग देण्यात येणार होत्या.
लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या बॅगच्या निर्णयावर टीका झाली होती. बॅगांपोटी ८१.९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राज्य शासनाचा हा निर्णय १७ जानेवारीला घेण्यात आला होता.
संक्षिप्त चर्चेनंतर, मोठ्या चार चाकी ट्रॉली बॅगऐवजी ब्रिफकेस देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांचे वाटप पेन ड्राइव्हच्या माध्यमातून होत असल्याने अशा मोठ्या बॅगची गरज नव्हती, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या मताला मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला.