
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मागे १६ दिवस बेमुदत उपोषण छेडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या अजून देखील पूर्ण झालेल्या नाहीत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी सामाज्याकडून तसंच ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावं यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारने काढावी, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र आमच्या ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. या मागणीसाठी अनेक ओबीसी संघटनांचे पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन छेडण्यात आलं आहे.
या संदर्भात आता राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अशीच मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे यांनी उपोषण करून मागणी केली आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून जातप्रमाणपत्र (कुणबी) दिलं जावं. जरांगे यांची मागणी ही असंविधानिक आहे. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्याचं त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावं. त्याला आमचा कोणाचाच विरोध नाही. परंतु, ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांचा विरोध आहे, यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष लक्ष लागलं आहे.