मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही! मनोज जरांगे यांचा नव्या सरकारला इशारा

मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याच्या अगोदरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला नव्याने इशारा दिला आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे यांनी १०० टक्के उपोषण करणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याच्या अगोदरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला नव्याने इशारा दिला आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे यांनी १०० टक्के उपोषण करणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी प्रथम देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, यापुढे मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणालाच आराम नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही.'

जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावे लागणार आहे, सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही, मराठ्यांपुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही, एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरे नाही, सत्ता आली म्हणून मस्तीत यायचे नाही, मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही. आंतरवाली सराटीमध्येही सामूहिक आमरण उपोषण होणार आणि ते खूप भव्य दिव्य होणार आहे.

आझाद मैदानावर उपोषण

१०० टक्के उपोषण होणार आहे. पण थोडे पुढे जायचे, असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर सामूहिक उपोषण होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. कधीच ओबीसी समाजाला विरोधक मानले नाही. सामान्य ओबीसींना एका शब्दाने दुखावले नाही. आम्हाला ओबीसींचा विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in