PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन करून त्याचे...
PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
Published on

राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही, अशी घोषणा केली आहे. भविष्यात पेट्रोल पंपावर 'No PUC, No fuel' योजनेची अंमलबजावणी सक्तीने राबवण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले. पर्यावरण रक्षणासाठी आणि अवैध प्रमाणपत्र निर्मितीवर आळा घालण्यासाठी “No PUC, No Fuel” योजना राज्यभर सक्तीने लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगून, “प्रत्येक वाहनाचे PUC वैध असणे अत्यावश्यक आहे. अवैध प्रमाणपत्रांवर आळा घालण्यासाठी पेट्रोल पंपावर ही योजना काटेकोरपणे अंमलात आणली जाईल,” असे सरनाईक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले.

सीसीटीव्हीद्वारे स्कॅन करणार वाहन क्रमांक

परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार, राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन करून त्याचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तपासले जाईल. प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.

पेट्रोल पंपावरच तात्काळ नवे प्रमाणपत्र – UIDसह पूर्ण पारदर्शकता

वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपावरच तत्काळ PUC काढून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी (UID) जोडले जाईल, जेणेकरून वेळोवेळी त्याची वैधता तपासता येईल.

याशिवाय, अवैध प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी धडक मोहीम देखील राबवली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in