केसीआर यांच्या बीआरएससोबत वंचितची चर्चा? प्रकाश आंबेडकर यांनी दिले स्पष्टीकरण

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘वंचित बहुजन आघाडी सोबत आली असती तर बरे झाले असते’ असे भूतकाळात गेल्यासारखे विधान केले. त्यापाठोपाठ...
केसीआर यांच्या बीआरएससोबत वंचितची चर्चा? प्रकाश आंबेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
Published on

प्रतिनिधी/मुंबई

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘वंचित बहुजन आघाडी सोबत आली असती तर बरे झाले असते’ असे भूतकाळात गेल्यासारखे विधान केले. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीसोबत मनोमिलनाचा कार्यक्रम जुळत नसल्याने नाराज असलेली वंचित बहुजन आघाडी आता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीशी युती करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. त्यामुळे वंचितचा आघाडीत समावेश होणार नाही, अशा चर्चांना बळ मिळाले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची बीआरएससोबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. अशा कपोलकल्पित गोष्टी मनोरंजनासाठी बनवल्या आणि सांगितल्या जातात. अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली. या चर्चेमध्ये राव यांनी राज्यात वंचितसोबत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा प्रस्ताव घेऊन भारत राष्ट्र समितीच्या मराठवाड्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन येथे ही भेट झाली असल्याची बातमी माध्यमांनी दिली. हे वृत्त खोटे असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वंचितने महाविकास आघाडीकडे सहा जागांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, वंचितने हे वृत्त निराधार ठरवले आहे. बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचे काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यासंदर्भात वार्तांकन करताना, शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. वंचितने आघाडीला सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा वंचितचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला. तसेच आघाडीकडून आलेल्या तीन जागांचा प्रस्ताव आम्ही फेटाळल्याचेही मोकळे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in