तेव्हा कुणालाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते; ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

२०१९ मध्ये आमच्याकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचेच नाव पुढे करण्यात आले होते.
तेव्हा कुणालाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते; ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

मुंबई : २०१९ मध्ये आमच्याकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचेच नाव पुढे करण्यात आले होते. तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. पण, भाजपच्या प्रमुख नेत्यांना हे मान्य नव्हते. तसेच, २०१९ मध्ये जेव्हा आम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करणारे पहिले नेते हे अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शरद पवार असो, राहुल गांधी असो, या दोघांचे एकमत होते की सरकारचे नेतृत्व अशा चेहऱ्याने करावे की महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाला ते मान्य असेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी नकोत. आम्ही वरिष्ठ आहोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. हे सांगणारे सगळ्यात पहिले हे सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

फडणवीसांपासून ते भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचीही अशीच भूमिका होती. शिंदे तेव्हा कोणालाच नको होते. शिंदे यांच्या कामाची पद्धत ही ‘पैसा फेको, तमाशा देखो’ हीच असल्याने अनेकांना ते आपल्या आसपास नको होते. त्यांनी राज्याचे नेतृत्त्व करावे हे भाजप किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नव्हते. तर आमची अशी भूमिका होती की शिंदेंची विधिमंडळाचे नेते म्हणून नेमणूक केली असल्याने कदाचित ते मुख्यमंत्री होतील.

ठाकरेंनंतर अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता - उमेश पाटील

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता, मात्र आता ते अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांचे नाव पुढे करून धादांत खोटे बोलत आहेत, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. उलट पहिल्या अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे व नंतरच्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार होता. ते नाव मात्र फारच गोपनीय ठेवण्यात आले होते. संजय राऊत यांना ते नाव माहिती होते. राऊत यांनी आता या नावाचा खुलासा करावा, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला आहे.

शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती - शरद पवार

महाविकास आघाडीचं सगळं काही ठरल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचं याबाबत बैठक झाली. आमच्याकडे त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंचे नाव आलेले नव्हते. शिवसेनेत तशी चर्चा झाली असावी, पण आमच्यापर्यंत त्यांचे नाव आले नव्हते. तसेच एकनाथ शिंदेंबाबत आमची काही तक्रार नव्हती. आत्ताही आमच्याशी त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. मात्र, तेव्हा तेवढी जवळीक नव्हती. विधिमंडळ पक्षांची बैठक बोलवण्यात आली तेव्हा राज्याचे नेतृत्व कुणाला द्यायचं याचा प्रस्ताव मांडण्यात आला. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते, मी त्यांचा हात हातात घेतला आणि तो उंचावला आणि त्यांच्या नावाचा विचार व्हावा, असे सांगितले. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि प्रतिसाद दिला. तेव्हा कुणीही एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नाही. विशेष गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः या पदासाठी आग्रही नव्हते. शिवसेनेच्या अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा झाली होती, ही गोष्ट मला नंतर समजली , असे शरद पवार यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in