
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज श्रीक्षेत्र देहू येथे आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार इ. नेते उपस्थित होते. मात्र सोहळा एका वेगळ्या घडामोडीने समोर येत आहे, शिवाय राज्यातील राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु झाल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अजित पवार न बोलल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करून हे सुचवले देखील होते.
संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान
या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून ते गंभीर आणि वेदनादायी आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. देहू येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी देणे ही भाजपची अंतर्गत बाब आहे. मात्र, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कार्यक्रमात अजित पवार यांना संबोधित करण्यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती, मात्र पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली नाही. महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. आमच्या राज्यातील नेते मंचावर आहेत. तिथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले जाते पण आमच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. ही दडपशाही आहे आणि त्यामुळे आमच्या नेत्याचा आवाज दाबला गेला आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना बोलण्याची संधी द्यायला हवी होती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.