प्रतिनिधी/मुंबई : मराठा आरक्षणावर विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन काहीही होणार नाही. आरक्षणाचा विषय हा राज्याचा नाहीच. तो केंद्र सरकारचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरचा विषय आहे. यात तांत्रिक अडचणी आहेत. हा फक्त झुलवण्याचा प्रकार आहे. हाताला काही लागणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या हातात नाहीच. तो केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरच सोडविला जाऊ शकतो. हे मी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे गेलो होतो, तेव्हाच स्पष्ट केले होते,” असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकांच्या कामाला शिक्षकांना जुंपण्यावरूनही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत. हजर न होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या निवडणूक आयोगालाच राज ठाकरे यांनी कारवाई करून दाखवाच, असे आव्हान देताना उलट निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. “मुंबई शहरात ४ हजार शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येते. मग मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो। अशी माणसे तयार का नाही करत? आयत्या वेळेला शाळेवर दडपण का आणतात. हजर न होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात येतो. मग निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला हवी.
निवडणुका अचानक येतात का निवडणुका होणार हे आयोगाला माहिती नसते का? या शाळकरी मुलांचा काय दोष? शिक्षक हे काय निवडणुकांची कामे करायला आलेत का? ते शिकवायला आलेत? पक्षाचे नेते आयोगाशी तातडीने बोलून घेतील. शिक्षकांना विनंती असेल की कुठेही रूजू होऊ नका. विद्यार्थ्यांना घडविणे शिक्षकांचे काम निवडणुकांचे काम करणे नव्हे. आयोगाने नवीन माणसे घ्यावीत. मला बघायचेच आहे कोण शिस्तभंगाची कारवाई करते ते,” असे राज ठाकरे म्हणाले.