साताऱ्यातील दंगेखोरांना नोटीसा

वातावरण शांततेचे आणि सौहार्दाचे रहावे, यासाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून दंगेखोरांना १४९ ची नोटीस बजावण्यास प्रारंभ केला आहे.
साताऱ्यातील दंगेखोरांना नोटीसा

कराड : पुसेसावळी (ता.खटाव) येथील एका समाजाच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्याने जिल्ह्यातील वातावरण तणावाचे बनले होते. सातारा पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने हे वातावरण पूर्वपदावर येत आहे. नुकतेच इंटरनेट सुरू करण्यात आले असून त्याच अनुषंगाने वातावरण शांततेचे आणि सौहार्दाचे रहावे, यासाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून दंगेखोरांना १४९ ची नोटीस बजावण्यास प्रारंभ केला आहे. गणेशोत्सव, बकरी ईद व पुसेसावळी प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच या काळात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पुसेसावळी घटनेनंतर सातारा जिल्ह्यात तणावाची परिस्थिती बनली होती. परंतु पोलिसांनी पुसेसावळी, सातारा शहर, कराड शहर या ठिकाणी लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले तर कराड शहरातील त्यांनी पायी रुट मार्च काढला. दरम्यान, साताऱ्यातही मुक मोर्चा काढणारे चळवळीतील काही पुढाऱ्यांना त्याच दिवशी पोलीस ठाण्यात नेवून समज दिली. तरीही त्यांनी शनिवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दंगेखोरांना १४९ च्या नोटीसा बजावल्या आहेत.सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेले असून या आदेशाचा भंग होवू नये म्हणून १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे.

आपणाकडून अगर आपले सहकारी यांच्याकडून सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश तयार करुन,फॉरवर्ड करुन सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करणे, मोर्चा काढणे, गर्दी जमवणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करणे,सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, कोणताही दाहक पदार्थ जवळ बाळगणे, शारीरिक इजा करता येईल यासाठी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणाबाजी करणे, वाद्य वाजवणे, तोडफोड करणे, शासकीय तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, असे गैरकृत्य झाल्यास वैयक्तिकरित्या आपणास जबाबदार धरण्यात येईल. आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आठ जणांना नोटीसा

पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतरही इंटरेनट सेवा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शहर व परिसरातील पाच जणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल,असे यात म्हटले आहे. वेगवेगळ्या ग्रुपच्या आठ जणांना नोटीस बजावण्यात आली असून संबंधितांना पोलीस स्टेशनला बोलवून समजवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in