प्रतिनिधी/मुंबई
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. मात्र ही अधिसूचना काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले असल्याची घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई येथे ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते.
संभाजीनगर येथे २० फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी येत्या ५ तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तिस्थळांना भेट देऊन आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरुवात चैत्यभूमीपासून होणार आहे. त्याचबरोवर सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व्हेंवर विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप नोंदविला.
सरकार एकाच समाजाचे हित पाहते
सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमिका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत ओबीसी समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवर आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन त्यांनी केले