

पेण: मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे डोलवी येथे उभ्या टँकरमधून मालकाच्या संमतीशिवाय फायड्राझूर केमिकल चोरून ते ड्रममध्ये भरत असताना दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रायगड जिल्ह्यात गेली अनेक वर्षे चोऱ्या करणाऱ्या अट्टल केमिकल तस्कर अश्रफ खान यालाही या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
३० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता मौजे डोलवी येथील हार्डवेअर रोडच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभ्या टँकर (क्रमांक एमएच ४३ वाय ७१५२) मधून केमिकल चोरी करून ड्रममध्ये भरले जात होते. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद केले असूनही वडखळ पोलीस स्टेशन हद्दीत मात्र वाढ होताना दिसत आहे. अश्रफ खान हा केमिकल तस्करी गेली अनेक वर्षे करत असून पुणे, महाड मार्गे येणाऱ्या केमिकलच्या टँकरमधून ड्रायव्हरशी संगनमत करून शेकडो लिटर वेगवेगळ्या प्रकारचा घातक व महागडा केमिकल चोरीच्या उद्देशाने काढत होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मुख्य केमिकल तस्कर अशरफ कमरुद्दीन खान आणि त्याचा सहकारी सैबान महंमद इलियास खान अशरफ कमरुद्दीन खान यांना ताब्यात घेत वडखळ पोलिसांच्या अटक केली आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वडखळ पोलीस करीत आहेत.