लव्ह जिहाद : अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट , काय आहे नेमकं प्रकरण ?

ती अमरावतीत आल्यानंतर तिचे सविस्तर उत्तर घेण्यात येईल, असे अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले
लव्ह जिहाद : अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट , काय आहे नेमकं प्रकरण ?

अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने घर सोडल्याची माहिती आता समोर आली आहे. बुधवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप करत पोलिसांवर आरोप केले होते. त्यावर काल मोठा गदारोळ झाला होता. आता पोलिसांनी या प्रकरणी मुलीचा शोध घेतला असून, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून मुलगी पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावतीतून पळून गेलेल्या तरुणीने सातारा पोलिसांना असा जबाब दिला असून आज रात्रीपर्यंत मुलगी अमरावतीला पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. ती अमरावतीत आल्यानंतर तिचे सविस्तर उत्तर घेण्यात येईल, असे अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या रागामुळे मुलगी एकटीच घरातून पळून गेली होती.

काय आहे नेमकं प्रकरण ?

अमरावती येथील एका 20 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत जबरदस्तीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मुलीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चांगलीच बाचाबाची झाली. त्या तरुणीला कोंडून ठेवले आले असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र तो कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. पोलिस तातडीने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. नवनीत राणा यांनी यासंदर्भात राजापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना फोन केला असता त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल केला. यावेळी पोलिस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी त्यांची जोरदार वादावादी झाली. यावेळेस राजापेठ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in