मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसने जायचंय? आता प्रवास झाला अजून सुखकर आणि सुरक्षित

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे गाडीला लिंक हॉफमैन बुश (एलएचबी) अपघातरोधक डबे जोडण्यात आल्याने आता या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास यापुढे आणखी सुरक्षित व सुखकर होणार आहे.
मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसने जायचंय? आता प्रवास झाला अजून सुखकर आणि सुरक्षित

कराड : कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे गाडीला लिंक हॉफमैन बुश (एलएचबी) अपघातरोधक डबे जोडण्यात आल्याने आता या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास यापुढे आणखी सुरक्षित व सुखकर होणार आहे. २५ जानेवारीपासून मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत केले जात आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे २५ जानेवारी रोजी रात्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंक हॉफमैन बुश (एलएचबी) अपघातरोधक डबे जोडण्यात आलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेस ही गाडी वर्षानुवर्षे मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावत आहे. या गाडीला पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांची सर्वाधिक पसंती आहे. त्यामुळे या गाडीसह या मार्गावरील सर्वच प्रवाशी एक्स्प्रेस गाड्यांना लिंक हॉफमैन बुश (एलएचबी) अपघातरोधक डबे जोडण्यात यावेत, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांसह प्रवाशांकडून होत होती. अखेर या मागणीची दाखल घेत, मध्य रेल्वे प्रशासनाने या गाडीला एलएचबी कोच जोडण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून केली. त्यामुळे आता या गाडीला जाताना व येतानाही दोन्ही बाजूंनी एलएचबी अपघातरोधक डबे जोडण्यात आले आहेत.

महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी दोन २२ डब्यांची एलएचबी रेक जाताना व येताना दोन्ही बाजूंनी जोडण्यात येणार आहे. यामध्ये दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय इकॉनॉमी, ४ शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह तीन द्वितीय श्रेणीचे अनारक्षित डबे अशी २२ डब्यांची संरचना असणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in