मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांकडून लागोपाठ दोन दिवस तपासण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयोगाकडून झुकते माप देण्यात येत असल्याची टीका होऊ लागल्याने बुधवारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी चांगलेच सक्रिय झाले व त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासून आम्ही नि:ष्पक्ष असल्याचे दाखवून दिले.
अजित पवारांच्या बॅगेत सापडल्या चकल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची व बॅगांची बारामती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अजितदादांच्या बॅगांमध्ये चकल्या सापडल्या. दरम्यान, अजित पवार त्यांच्याकडील दुसरा डबाही तपासण्यासाठी देत असल्याचे व्हिडीओत दिसून आले. निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणामध्ये पार पडाव्या यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना गरजेच्या आहेत, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. बारामती मतदारसंघात त्यांची बॅग तपासण्यात येत असतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आला आहे.
माझ्या बॅगेत कपडे, युरिनपॉट नाही - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पालघर दौऱ्यावर होते. पालघर दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ‘माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही’, असे शिंदे म्हणाले.
फडणवीसांचीही बॅग तपासली
त्यापूर्वी कोल्हापूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी करण्यात येत असल्याचा व्हिडीओ भाजपने ‘एक्स’वर पोस्ट केला. काही जणांना नाटक करण्याची सवयच असते, केवळ घटना हातात धरणे पुरेसे नाही, घटनेचे पालन करणेही महत्त्वाचे आहे, अशी या व्हिडीओच्या बाजूला पोस्ट करण्यात आली आहे.
लोकांच्या दबावामुळे सत्ताधाऱ्यांच्याबॅगांची तपासणी - रोहित पवार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा सुरक्षा यंत्रणानी दोनदा तपासली. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या बॅगाही तपासा, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागल्यामुळेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या बॅगांची तपासणी व्हायला लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) युवा नेते रोहित पवार यांनी केला.