आता चर्चा रंगतेय खडसेंच्या घरवापसीची!

एकनाथ खडसे यांनी चाळीस वर्ष भाजपात काढले. जिल्ह्यात, राज्यात पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहीले आहे.
आता चर्चा रंगतेय खडसेंच्या घरवापसीची!

विजय पाठक/ जळगाव : काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या वाटेवर असतानाच राष्ट्रवादीचे वजनदार नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार राजकीय चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. भाजपाचे मंत्री, जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी खडसेंचे भाजपात प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे म्हटल्याने या विधानास पुष्टी मिळाली आहे. खडसेंच्या या राजकीय घरवापसीची चर्चेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, खडसे समर्थंक मात्र गोंधळलेले आहेत.

एकनाथ खडसे यांनी चाळीस वर्ष भाजपात काढले. जिल्ह्यात, राज्यात पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहीले आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा मात्र भाजपात राहून पूर्ण होऊ शकली नाही, त्यातून पक्षाशी झाालेले मतभेद, उदभवलेले भोसरी प्रकरण यातून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा दयावा लागला. काही काळ एकांतवास केल्यावर भाजपा सोडून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कायम कार्यकर्ते, समर्थकांच्या गराडयात राहण्याची सवय असलेल्या खडसेंना राष्ट्रवादीत अपेक्षित स्थान मिळाले नाही. जिल्ह्यात देखील खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यास येथील नेत्यांचा विरोध होता हा शरद पवारांपर्यंत पोहचवला होता. हा विरोध डावलत पवारांकडून खडसेंना प्रवेश देण्यात आला. या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी मजबूत होईल, ही पवारांची अपेक्षा होती ती फोल ठरली.

खडसेंमागे लागलेले भोसरी प्रकरण संपत नसल्याने खडसे अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी मागे नाही. या पार्श्वभूमीवर खडसेंची घरवापसीची चर्चा जिल्ह्यात रंगायला लागली. सोमवारी गिरीश महाजन यांनी खडसे हे भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आपण्यास मिळाल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आणि वरीष्ठ पातळीवरून सिग्नल मिळाला, तर पाहू अशी गुगली टाकत मोकळे झाले. दरम्यान, खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे प्रसिध्द झााले आहे.

हे पाहता आदर्श घोटाळा मागे लागलेला असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची घटना समोर असताना एकनाथ खडसेंच्या मागे लागलेले भोसरी प्रकरण संपलेले नाही, ही बाब लक्षात घेउुन दोन पावले मागे सरकत खडसे भाजपात प्रवेश करण्याबाबत प्रयत्नशील असावेत असे दिसते. एकनाथ खडसे यांनी मात्र माझे भाजपा प्रवेशासाठी कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत, तसे करण्याची गरज ही नाही, असे सांगत हा विषय संपवला. असे असले, तरी जिल्हयात राजकीय कार्यकर्ते यावर विश्वास ठेवण्यास तयार नसून, जोरदार चर्चा रंगतेय खडसेंच्या घरवापसीची!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in