
मुंबई : राज्यातील महिला बचत गटांना उत्पादन विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असून प्रायोगिक तत्त्वावर १० उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असून राज्यात सध्या ११ लाख लखपती दीदी आहेत. मार्च २०२५ पर्यंत २५ लाख लखपती दीदी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बांद्रे-कुर्ला संकुल, येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मंगळवारपासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२५चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
“महालक्ष्मी सरस हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील. बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खासगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. ‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखापेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. लवकरच २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा शासनाचा मानस आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी मॉल उभारण्यात येणार आहेत. तालुक्यात देखील विक्री केंद्र सुरू करण्यात येतील. बचत गटांसोबतच वैयक्तिक कर्ज देण्यासाठी निर्णय झाला पाहिजे. उमेद अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. दरवषी होणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
वूडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट आकर्षण!
सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला ११ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल आहे. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत, त्यापैकी ९० फूड स्टॉल आहेत.