महायुतीचे उर्वरित जागावाटप लवकरच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ आणि अजित पवारांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे.
महायुतीचे उर्वरित जागावाटप लवकरच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Published on

प्रतिनिधी/मुंबई

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली असतानाही जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत बैठका होत आहेत. आता जवळपास अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलो असून दुसऱ्या टप्प्याच्या जागाही अंतिम झाल्या आहेत. लवकरच जागांची घोषणा होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्‍ट केले आहे.

तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ आणि अजित पवारांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आग्रही आहेत. तर भाजपचाही या जागेवर दावा आहे. भाजपला तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उतरवायचे आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटातून हेमंत गोडसेंचे नाव आहे तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचेही नाव इथून सुरू आहे. धाराशिववर देखील शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा आहे. या तिढ्यामुळे अद्यापही जागावाटप अंतिम होत नाही.

“एकमत होण्यासाठी बैठका कराव्याच लागतात. जवळपास अंतिम निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत. दुसऱ्या टप्प्याच्या जागादेखील अंतिम झाल्या आहेत. लवकरच जागांची घोषणा होईल,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

जानकरांना मत म्हणजे मोदींना मत - देवेंद्र फडणवीस

महादेव जानकर हे महायुतीतून परभणी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे माहीत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेश दिला आहे. महादेव जानकरांना सांगा, मी त्यांची लोकसभेत वाट पाहत आहे, असा हा संदेश परभणीकरांसाठी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली. महादेव जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतली. तेव्हा हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणीला जाणार असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले, “जानकरांना सांगा की, मी त्यांची लोकसभेत वाट पहात आहे. जानकरांना आता लोकसभेत पाठविण्याची जबाबदारी परभणीकरांची आहे, असे मोदी म्हणाले. मोदींचा हा संदेश मी घेऊन आलो आहे. परभणीकर आता जानकरांना लोकसभेत पाठवणार ना,” असे आवाहनही फडणवीस यांनी केले. बोर्डीकर, विटेकर, लोणीकर या तिघांची ताकत महादेव जानकर यांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य घटकांचा सर्वांगीण विकास केलाय. जे विकसित देशांना जमले नाही ते मोदीजींनी करून दाखवले. सामान्यांकरिता मोदींनी १० वर्षे दिली. पुढच्या ५ वर्षांत भारत आणि महाराष्ट्र बदलणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in