तीन रुग्णांमागे एक परिचारिका ; जागतिक परिचारिका दिन विशेष

राज्य सरकारच्या रुग्णालयात नर्सिंग अलाऊन्स देण्यात येतो; मात्र मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांनी महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनकडे सतत मागणी
तीन रुग्णांमागे एक परिचारिका ; जागतिक परिचारिका दिन विशेष
Published on

'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' ही भावना मनाशी बाळगत रुग्णालयीन स्टाफ आपली जबाबदारी पार पाडतात; मात्र मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात आजही परिचारिकांची शेकडो पदे रिक्त असून, ती भरली जात नसल्याने अन्य परिचारिकांवर कामाचा ताण येतो. जनरल वॉर्डमध्ये तीन पेशंट मागे एक परिचारिका असा रेषो नर्सिंग परिषदेने ठरवला आहे; मात्र मुंबई महापालिका प्रशासनाकडून नर्सिंग परिषदेच्या रेषोची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सहाय्यक सरचिटणीस रंजना आठवले यांनी दै. 'नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केली.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई नव्हे तर देशभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. योग्य उपचार पद्धती यामुळे रुग्ण मोठ्या विश्वासाने पालिका रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी जाणे हाच मुख्य उद्देश घेऊन रुग्णालयातील प्रत्येक स्टाफ आपली जबाबदारी पार पाडतात. यात परिचारिका ही आपली जबाबदारी चोख बजावतात. कुठलीही अपेक्षा न करता परिचारिका आपले कर्तव्य बजावतात. राज्य सरकारच्या रुग्णालयात नर्सिंग अलाऊन्स देण्यात येतो; मात्र मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांनी महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनकडे सतत मागणी केली असून, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, अशी खंत परिचारिकांनी व्यक्त केली.

राज्य सरकारचा पॅटर्न राबवा!

राज्य सरकारच्या रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस रात्रपाळीचे पॅटर्न आहे. एक दिवस रात्रपाळी करणे त्यानंतर रात्रपाळीची एक सुट्टी आणि दुसऱ्या दिवशी विकली ऑफ असतो. यामुळे परिचारिकांना दोन दिवस आराम मिळतो आणि बिघडलेले शारिरीक वेळापत्रक सुधारण्यास वेळ मिळतो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आधीच परिचारिकांची पदे रिक्त असून, ती भरली जात नाही. जागतिक परिचारिका दिन म्हणून मुंबई महापालिका रुग्णालयांत साजरा केला जातो, परंतु परिचारिकांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. पालिका प्रशासनाने नाईट ड्युटीची संख्या कमी करणारा ड्युटी पॅटर्न राबवावा. परिचारिकांना तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागते आणि नाईट ड्युटीला कुठलीही परिचारिका नाही म्हणत नाही. ती जबाबदारी पार पाडत असते. परंतु परिचारिकांची संख्या वाढवली, तर अन्य परिचारिकांवर कामाचा ताण येणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने परिचारिकांच्या प्रश्नांचा परिचारिका दिनानिमित्त गांभीर्याने विचार करावा.

- रंजना आठवले, सहाय्यक सरचिटणीस, म्युनिसिपल नर्सिंग ऍन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन.

कोरोना काळात तीन महिने घरापासून दूर!

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना विषाणू काय याचा अनुभव कोणाकडे नव्हता. परंतु कोरोना बाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता बाधित रुग्णांची सेवा करणे हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून रुग्णसेवा केली. या काळात मुंबई महापालिका, खाजगी संस्था यांचे सहकार्य लाभले. कोरोना काळात राहण्याची सोय, जेवणं, नाष्टा सगळ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या; मात्र मुंबई महापालिका रुग्णालयांतील परिचारिकांचा काही प्रश्न जसे रिक्त पदे भरणे, ड्युटीचे वेळापत्रक या गोष्टींकडे लक्ष देत हे प्रश्न सोडवणे हीच मापक अपेक्षा.

- श्रुती गमरे, परिचारिका, केईएम रुग्णालय

.... तर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात परिचारिका असो अन्य कर्मचारी याची रिक्त पदे भरपूर आहेत. नायर रुग्णालयात तर ६० ते ७० पेशंट मागे तीन ते चार परिचारिका काम करतात. त्यामुळे काही वेळेस रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णालयीन स्टाफमध्ये वाद निर्माण होतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने परिचारीकेसह अन्य विभागातील रिक्त पदावर लवकरात लवकर नियुक्ती करावी.

-वैशाली शशिकांत थोरात, परिचारिका, नायर रुग्णालय

परिचारिका या क्षेत्रात आले त्याबद्दल स्वतःला धन्य समजते. कारण कोरोना काळात जे अनुभले ते रोजच्या दैनंदिन कामात अनुभवते त्यात फरक होता. या प्रोफेशनने खूप काही दिले जीवनात. मॅनेजमेंट, रिस्पेक्ट, एजेस्टमेंट व वेळेचे महत्त्व अशा खूप गोष्टी रुग्णालयात शिकण्यास मिळाल्या. रुग्ण सेवा करत घरचीही जबाबदारी पार पाडतो हा अनुभव परिचारिका म्हणून आला आहे. त्यामुळे परिचारिका हे क्षेत्र निवडले याचा खूप अभिमान आहे.

- सीमा कांबळे, अधिपरिचारिका, सायन रुग्णालय

पालिका व पेरिफेअल रुग्णालयातील परिचारिकांची संख्या

प्रसूती व उपनगरीय रुग्णालय -

एकूण पदे - २,४२०, भरलेली पदे - २१४९ - रिक्त पदे - २७१

--

केईएम रुग्णालय

एकूण पदे - ९८१ - भरलेली पदे - ८९० - रिक्त पदे - १०१

--

नायर रुग्णालय

एकूण पदे - ६८८ - भरलेली पदे - ६२९ - रिक्त पदे - ५९

--

सायन रुग्णालय

एकूण पदे - ८९४ - भरलेली पदे - ७७८ - रिक्त पदे - ११६

--

नायर दंत रुग्णालय

एकूण पदे - २४ - भरलेली पदे - २१ - रिक्त पदे - ३

--

कस्तुरबा रुग्णालय

एकूण पदे - १६१ - भरलेली पदे - १२८ - ३३

--

क्षयरोग रुग्णालय

एकूण पदे - ३११ - भरलेली पदे - २५३ - रिक्त पदे - ५८

--

कान नाक घसा रुग्णालय

एकूण पदे - ३३ - भरलेली पदे - २४ - रिक्त पदे - ९

--

नेत्र रुग्णालय

एकूण पदे - २७ - भरलेली पदे - २६ - रिक्त पदे - १

--

अँक्वर्थ रुग्णालय

एकूण पदे - १ - भरलेली पदे - ० - रिक्त पदे - १

-----

परिचारिका एकूण पदे - ५,५५०

भरलेली पदे - ४,४९८

रिक्त पदे - ६५२

logo
marathi.freepressjournal.in