सुकामेव्याचे पौष्टिक लाडू महागले डिंकाच्या दरात १५ टक्के वाढ : ग्राहकांची मागणी मात्र कायम

लाडूसाठी मेथी, डिंक आणि तेलबिया यांचा वापर केला जातो. त्वचा, मेंदू व हाडांच्या बांधणीसाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.
सुकामेव्याचे पौष्टिक लाडू महागले डिंकाच्या दरात १५ टक्के वाढ : ग्राहकांची मागणी मात्र कायम

नांदेड : दुपारी जरी गरम होत असले तरी, सकाळच्या हवेत सध्या चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. गेली अनेक वर्षे थंडीच्या दिवसात आपल्याकडे डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनविले जातात. याशिवाय अनेकांच्या घरी सुकामेव्याचे लाडूही बनवले जातात; मात्र, सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने यंदा पौष्टिक लाडू खाण्यासाठी अधिक रुपये मोजावे लागणार आहे. सुकामेवा १५ टक्क्यांनी महागला तरी मागणी मात्र कायम असल्याच विक्रेत्यांनी सांगितले.

खोबरा व खोबरा किसला मागणी आहे. राजापूर आणि गोटा खोबऱ्याला ग्राहकांची जास्त पसंती आहे. बदाम, काजू, डिंक, गोडंबी, आळीव, अंजीर, अक्रोड, खसखस यांचा वापर डिंक, मेथी आणि पौष्टिक लाडूमध्ये करण्यात येतो. सुकामेवा आणि पौष्टिक लाडूंसाठी आवश्यक मदार्थांची मागणी आता वाढू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुकामेवा १५ टक्के महाग झाला आहे. दिवाळीनंतर ग्राहकांची वर्दळ कमी झालेली असली तरी दिवाळीचा फराळ संपताच गृहिणी पौष्टिक लाडू तयार करायला सुरुवात करतात. या दिवसात शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते. त्याची कसर डिंकाचे आणि मेथीचे लाडू भरून काढत असतात. त्यामुळे डिंक आणि मेथीचे लाडू हिवाळ्यात खाल्ले जातात. डिंक आणि मेथीच्या लाडूतून शरीराला अनेक गरज असणाऱ्या जीवनसत्वाची पूर्तता होत असते.

सुकामेव्याचे प्रति किलो दर

खोबरा किस - २४०

खारीक - १६० ते ३००

खारीक पावडर - २४०

काजू -६५० ते ८००

बदाम - ६५० ते ८००

डिंक - ३५०० ते ५०००

गोडंबी - १०००

मेथी - ९० ते १००

अंजीर - १००० ते १५००

अक्रोड - ५०० ते ६००

काळीपेंड खजूर - १५० ते १८००

पिस्ता (नमकसह) ११००

पिस्ता (बिगर नमक) १६००

गावरान खसखस - ७०० रुपये

लाडूसाठी मेथी, डिंक आणि तेलबिया यांचा वापर केला जातो. त्वचा, मेंदू व हाडांच्या बांधणीसाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. डिंक आपल्याला चांगली ऊर्जा तर देतेच. पण आपल्या त्वचेचे व आतड्यांचे देखील आरोग्य चांगले ठेवण्यास यामुळे चांगली मदत करते. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांचा त्रास कमी होण्यास याची खुप मदत होते.

- उषा जाधव, आहारतज्ज्ञ, नांदेड.

logo
marathi.freepressjournal.in