नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी
लासलगाव : उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही लासलगाव शहरात सर्रास नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
नायलॉन मांजामुळे रविवारी लासलगाव येथे सुमारे ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. येथील दत्त मंदिराच्या बाजूने रस्त्यावरून अक्षय नहाटा हा तरुण दुचाकीवरून घरातून दुकानाकडे जात असताना अचानक नायलॉन मांजा त्याच्या तोंडाजवळ अडकला. धारदार नायलॉन मांजामुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली असून, उपचारादरम्यान तोंडाजवळ तब्बल २१ टाके घालावे लागले.
दरम्यान, उच्च न्यायालयाकडून नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी असतानाही लासलगाव शहर व परिसरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री आणि वापर सुरू असल्याचा आरोप नहाटा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
कापड व्यापारी अक्षय नहाटा हा नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाला असून त्याच्या तोंडाजवळ २१ टाके पडले आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा; मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये.
डॉ. योगेश चांडक, वैद्यकीय अधिकारी लासलगाव
