अंतरवाली : मराठा आंदोलक आणि बांधव सगळे शांतच आहेत. तरीही त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले जात असल्याचे दिसत आहे. विनाकारण खोट्या केसेसमध्ये गुंतवले जात आहे. या सगळ्याकडे सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.
“मला भेटायला बीडचे काही लोक आले होते. त्यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांच्या पाहुण्यांचे हॉटेल, त्यांच्याच पोरांनी फोडले आहे. सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी पूर्वी बोललो होतो. हे आता तंतोतंत खरे होताना दिसते आहे. मराठ्यांना फोडाफोडी आणि जाळपोळीशी घेणेदेणे नाही. मराठे फक्त स्वत:च्या लेकराला न्याय मिळावा म्हणून उभे आहेत. गोरगरीबांच्या पोरांवर खोट्या केसेस करून, ओबीसींचे नेते बीडला जाऊन विनाकारण जात संपली पाहिजे, पोरं मोठी नाही झाली पाहिजेत, यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहेत. ते पोलीस अधीक्षकांजवळही जाऊन बसले होते, अशी माहिती आहे,” असेही जरांगे-पाटील म्हणाले.
“मराठा समाजाची काही पोरं, कुणाच्याही उद्रेकात किंवा कशातच नाहीत. साखळी उपोषण करणारे, शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणांना गोवले जात आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही सांगू इच्छितो की हे आमच्याविरोधात षड्यंत्र आहे. आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही मागे हटणार नाही. जे खरोखर उद्रेक करत आहेत त्यांना सोडू नका. मात्र सामान्य मराठा तरुणांना अडकवून बदनाम करण्यासाठी ओबीसींचे काही नेते प्रयत्न करत आहेत. निष्पाप आंदोलकांना अडकवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे माझे सरकारला आणि सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन आहे,” असेही त्यांनी सांगितले.
खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही
“आम्हीसुद्धा मागे हटणार नाही. आम्ही ५४ टक्के आहोत, हे कुणीही विसरू नये. बीडमधल्या पोलिसांवर दबाव आणला जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना गुंतवण्याचे काम सुरू आहे. आम्ही खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही तसेच केसेसना भीत नाही,” असेही मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.