"हे सगळं सरकार घडवतंय..." ओबीसी आंदोलनावरून मनोज जरांगेंची सरकारवर टीका

मी ओबीसी आंदोलकांना दोष देत नाही, तो त्यांचा अधिकार आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
"हे सगळं सरकार घडवतंय..." ओबीसी आंदोलनावरून मनोज जरांगेंची सरकारवर टीका
Published on

जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली 'ओबीसी आरक्षण बचाव' आंदोलन सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून दोघांचीही प्रकृती खालावली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही ते आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं प्रतिसाद दिला, त्यांचे लाड केले, परंतु ओबीसी समाजाच्या आंदोलनाला सरकार गांभीर्यानं घेत नाही, अशी टीका ओबीसी आंदोलकांकडून केली होती. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ओबीसी आंदोलकांना दोष देत नाही, तो त्यांचा अधिकार आहे असं मनोज जरांगे म्हणाले. हे सगळं सरकार घडवून आणतंय, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

हे सगळं सरकार घडवून आणतंय...

यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (ओबीसी) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणाऱ्यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणतंय. असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना (ओबीसी) म्हणतच नाही. एक दिवस त्यांचेही आंदोलन संपणार आहे. आमचेही संपणार आहे. सरकार डाव खेळत आहे. पण सरकारच्या एक लक्षात येत नाही. हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणीत येणार आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. नियोजनबद्ध पद्धतीने येणे, राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने निघाले. हे लगेच लक्षात येते. ठरवून असलेले लगेच लक्षात येते. तू बस मी येतोच दुसऱ्या दिवशी... तेथे बसलेल्या बांधवांना दोष देऊन काही उपयोग नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे."

ओबीसी समाज आक्रमक-

लक्ष्मण हाके आणि नवनाथ हाके यांचं जालन्यातील वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं, मात्र त्यानंतरही त्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान ओबीसी समाज काल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. सरकार ओबीसी आंदोलनाची म्हणावी अशी दखल घेत नाही, अशी तक्रार ओबीसी आंदोलकांची आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सरकारमधील अनेक मंत्री, नेते आंदोलनस्थळी जात होते. सरकारनं जरांगेंच लाड पुरवले, मात्र ओबीसी आंदोलनाला सरकार गंभीरपणे घेत नाही, असं आंदोलक म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in