OBC Sabha: 'या' प्रमुख मागण्यांसाठी ओबीसींचा 'महाएल्गार'!

विशेष म्हणजे मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून केवळ 20 किमी अंतरावर ओबीसींची ही महाएल्गार सभा पार पडणार आहे
OBC Sabha: 'या' प्रमुख मागण्यांसाठी ओबीसींचा 'महाएल्गार'!

राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका अशी मागणी ओबीसी नेत्याकडून केली जात आहे. यासाठी ओबीसी नेत्याची सभा आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे महाएल्गार सभा पार पडणार आहे. संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला आता ओबीसी नेत्यांनी जाहीर विरोध केला आहे. तर, हाच विरोध दर्शवण्यासाठी आज अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेच्या माध्यमातून ओबीसी नेत्यांनी आपल्या काही मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत.

'या' आहेत ओबीसींच्या प्रमुख मागण्या

-ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करु नका

-बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

-मराठा समाजाला जी खोटी कुणबी प्रमाणपत्रं दिली आहेत ती रद्द करावी

-खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

-7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करा.

-बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं

-धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

आज जालन्यातील अंबड येथे होणाऱ्या ओबीसींच्या महाएल्गार सभेला राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर अशा दिग्गजांची उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ही भव्य सभा होणार आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून केवळ 20 किमी अंतरावर ओबीसींची ही महाएल्गार सभा पार पडणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in