'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले महिनाभर पाऊस गायब असून ‘ऑक्टोबर हिट’चा चटका मात्र तीव्रतेने जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसात तर दोन्ही जिल्ह्यांना उष्णतेचा चांगलाच तडाखा बसला आहे.
'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान
'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान
Published on: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले महिनाभर पाऊस गायब असून ‘ऑक्टोबर हिट’चा चटका मात्र तीव्रतेने जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसात तर दोन्ही जिल्ह्यांना उष्णतेचा चांगलाच तडाखा बसला आहे.

ऑक्टोबरमध्ये सिंधुदुर्गात पावसाळी वातावरण असते मात्र आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली असून गेल्या दोन दिवसात तर अचानक वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्णतेच्या तडाख्याने लोक पुरते हैराण झाले आहेत.

गेले दोन -तीन दिवस दोन्ही जिल्ह्यातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले आहे हवेतील प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता आणि उकाडा ४० ते ४३ अंश सेल्सियस एवढा तीव्र अनुभवायला मिळत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच वातावरणात उष्णता वाढून दुपारच्या सुमारास असह्य उकाडा होत आहे.

हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम संपल्याची घोषणा नुकतीच केली आहे. पुढील काही दिवसात तर परतीचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मात्र परतीचा पाऊस अजूनही दृष्टीपथात नाही.

ऑक्टोबर महिना सुरू होण्यापूर्वीच कोकणात सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याने तर पुढील तीन दिवस मुंबई सह संपूर्ण कोकण प्रदेशात उष्ण व दमट वातावरणाचा 'येलो अलर्ट' चा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसात कमाल तापमान ३४ ते ३६ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे परिणामी उष्णतेचा हा धडाका पुढील काही दिवस असाच कायम राहण्याची चिन्हे आहेत.

उष्णतेच्या या तडाख्यामुळे सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांमध्ये उष्णतेची झळ अतिशय तीव्रतेने जाणवत आहे. कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा भाग सर्वात उष्ण ठरला आहे. मालवण,देवगड, वेंगुर्ले सारख्या सागरीपट्ट्यातही समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्यामुळे उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली आहे.

दरम्यान उष्णतेच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. १२ ते ४ या वेळेत कामाशिवाय फिरू नये.

अशी घ्या काळजी

या कालावधीत बाहेर पडणे अत्यंत गरजेचे असेल तरच डोक्यावर टोपी छत्री किंवा रुमाल अशा साधनांचा वापर करावा. शरीराचे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ‘डिहायड्रेशन'चा धोका निर्माण होतो हे लक्षात घेऊन पुरेसे पाणी प्यावे. सोबत पाण्याची बाटली ठेवावी तसेच उष्णतेचा सामना करण्यासाठी लिंबू सरबत, ताक शाळेचे पाणी,या द्रव्य पदार्थांचे सेवन करावे असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in