मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला होता. त्यात उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनर्स लावण्यात आले होते. ठाणे ते मुंब्रा परिसरात लावण्यात आलेले बॅनर्स काही अज्ञात व्यक्तींनी फाडले होते. या घटनेनंतर उपनेते शरद कोळी यांनी ११ नोव्हेंबरला एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला होता. रात्रीच्या वेळेस पोस्टर फाडल्यास दिवसा शिवसैनिक त्याचा बदला घेतील. याबाबतचा एक व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर शिंदे गटाने निर्मलनगर पोलीस ठाण्यात शरद कोळी यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा व्हिडीओ सोलापूर येथून व्हायरल झाल्याने या गुन्ह्याचा तपास सोलापूरच्या कामठी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.