
राज्यात मराठा आरक्षणावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. राज्यात मराठा समाजाच्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी संपूर्ण राज्यात प्रचार, मोर्चे, उपोषण, रॅली करण्यात आली होती. इतकेचं नाही तर मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण देखील केलं होत. मात्र, तरी सरकारनं ठोस निर्णय सांगितला नाही. जरांगेंनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.
राज्यातील संपूर्ण मराठा समजाला सरसकट कुणबी दाखले मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच आहे. सरकार देखील मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, मराठा समाजाला हे आरक्षण ओबीसीमधून दिलं जाणार असल्याने आता ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवला असून ओबीसी समन्वय समितीने या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून मारझोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मराठा कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून मारहाण केली आहे. या प्रकरणात मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वतः प्रताप कांचन याने मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधत या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. तर राम जाधव, योगेश पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे असे, गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सोलापुरात मराठा आंदोलकांनी प्रताप कांचन या तरुणास ओबीसी मधून आरक्षण देण्यास तुझा विरोध का आहे? अशा पद्धतीने जाब विचारला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रताप कांचनच्या डोक्यावरून ऑइल ओतलं. तसंच त्याला मारहाण देखील करण्यात आली. आंदोलक तरुणांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केलं. तसंच खिशातून पैसे काढून घेतले, बदनामी केली, अशा आशयाची फिर्याद मराठा कार्यकर्त्यांविरोधात देण्यात आली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या 5 आरोपी विरोधात भादवि कलम 307, 143, 147, 149, 327, 427, 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.