‘वृद्धापकाळ सुश्रुषा’ ठरतेय वृद्धांसाठी संजीवनी; वर्षभरात १० लाखांहून अधिक वृद्धांवर उपचार

वृद्धांच्या समस्या जाणून घेत त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी हाती घेतलेल्या राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांतर्गत वर्षभरात १० लाख ४९ हजार २५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले आहेत.
‘वृद्धापकाळ सुश्रुषा’ ठरतेय वृद्धांसाठी संजीवनी; वर्षभरात १० लाखांहून अधिक वृद्धांवर उपचार
Published on

मुंबई : वृद्धांच्या समस्या जाणून घेत त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी हाती घेतलेल्या राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांतर्गत वर्षभरात १० लाख ४९ हजार २५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांत राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत गेल्या वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत ७,७०,९५६ वृद्धांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. ४८,३९१ वृद्ध रुग्णांना वार्डात दाखल करण्यात आले. तसेच १८,४५९ वृद्ध रुग्णांना पुनर्वसनात्मक सेवा, २,११,४४५ वृद्ध रुग्णांची तपासणी, तर ८,४७७ वृद्धांना घरी जाऊन आरोग्य सेवा पुरविण्यात आली. राज्यात सन २०१०-११ पासून राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये २०१०-११ पासून, नंदुरबार, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये २०१५-१६, अकोला, यवतमाळ, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, रायगड, सातारा, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये २०१७-१८ पासून, तर ठाणे, जळगाव, नागपूर, सोलापूर, सांगली, पालघर या जिल्ह्यांमध्ये २०१८-१९ पासून या कार्यक्रमानुसार वृद्धांना आरोग्य सेवा पुरविली जाते.

या सेवा पुरविल्या जातात

कार्यक्रमांतर्गत वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे, वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या ओळखून त्यांचे निरसन करणे, वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे, आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीॲट्रिक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे अशा सेवा पुरविल्या जातात.

logo
marathi.freepressjournal.in