अंडी घालण्यासाठी 'ऑलिव्ह रिडले' कासव किहीम समुद्रकिनारी; अंड्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास पहारेकरी, आनंदोत्सव साजरा करणार

"मागील ३० ते ४० वर्षे येथे अशा प्रकारची घरटी कधीही आढळून आलेली नव्हती. आजची घटना आमच्यासाठी आनंदाची आहे. साधारण ५० दिवसांनंतर या घरट्यातून पिल्ले बाहेर पडणार असून आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत."
अंडी घालण्यासाठी 'ऑलिव्ह रिडले' कासव किहीम समुद्रकिनारी; अंड्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास पहारेकरी, आनंदोत्सव साजरा करणार
Published on

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या दुर्मिळ समुद्र कासवाने अंडी घातल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी दुपारी भरतीच्यावेळी किनाऱ्यावर येवून घरटे करून तब्बल १५० अंडी घालून मादी समुद्रात परतली असल्याची माहिती रायगड वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर समीर शिंदे यांनी दिली आहे. हे कासव दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरजेचे असल्याची भावना कांदळवन दक्षिण कोकण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

तब्बल ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने किहीम समुद्रकिनारी घरटे करून अंडी घातल्याची माहिती येथील ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. परिणामी किहीम समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या निमित्ताने शिक्कामोर्तब केले आहे. ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते. वाळूच्या खाली १००-१५० या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या सहाय्याने अंडी बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतःच उबतात. समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे अंडी उबवण्याच्या ठिकाणी थांबत नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, तब्बल ४० वर्षाने समुद्री कासवाने किहीम समुद्रकिनारी घरटे करून अंडी घातलेल्या ठिकाणी वन विभागाच्या कांदळवन विभागाच्या उप वनसंरक्षक कांचन पवार, वन अधिकारी प्रियांका पाटील, आरएफओ समीर शिंदे व किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत.

नोव्हेंबर ते मार्च विणीचा हंगाम

प्राकृतिक अधिवास उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंध असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीचे वजन ५० किलोग्रॅमपर्यंत असते तर लांबी ६० ते ७० सेंटीमीटर असते. त्यांचा विणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा पाच महिन्यांचा असतो. रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका विणीच्या हंगामात २ ते ३ वेळा साधारणतः अंडी घातली जातात. मादी एकावेळी १०० ते २०० अंडी घालते. ४५ ते ५५ दिवसात अंडी नैसर्गिकरित्या उबतात व त्यातून पिल्ले जन्माला येतात. येथे देखील पिल्ले जन्माला येईपर्यंत, अंड्यांची काळजी घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी अखेरीस सांगितले.

या घरट्या भोवताली तारेचे कुंपण घातले जाणार असून, २४ तास पहारा देण्यासाठी पहारेकरी ठेवण्यात येणार आहेत. मागील ३० ते ४० वर्षे येथे अशा प्रकारची घरटी कधीही आढळून आलेली नव्हती. आजची घटना आमच्यासाठी आनंदाची आहे. साधारण ५० दिवसांनंतर या घरट्यातून पिल्ले बाहेर पडणार असून आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत.

- प्रसाद गायकवाड, सरपंच, किहीम ग्रामपंचायत

logo
marathi.freepressjournal.in