मविआच्या जागावाटप फॉर्म्युल्याची आज घोषणा

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात काही जागांवरून टोकाचे मतभेद झाले. एकीकडे राष्ट्रवादीने भिवंडीची मागणी केली होती, तर दुसरीकडे शिवसेनेने सांगलीचा उमेदवार परस्परच जाहीर करून टाकला होता.
मविआच्या जागावाटप फॉर्म्युल्याची आज घोषणा
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीत जागावाटपावरून गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू होती. विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. अखेर वाद-प्रतिवादातून जागावाटपाचा तिढा सुटला असून, पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता शिवालय, नरिमन पॉइंट येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत अंतिम जागावाटपाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात काही जागांवरून टोकाचे मतभेद झाले. एकीकडे राष्ट्रवादीने भिवंडीची मागणी केली होती, तर दुसरीकडे शिवसेनेने सांगलीचा उमेदवार परस्परच जाहीर करून टाकला होता. त्यातच मुंबईच्या जागांवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला होता. हा तिढा न सुटल्याचेच चित्र निर्माण झाले होते. शिवसेनेने मुंबईत ६ पैकी काँग्रेसला २ जागा सोडून ४ जागांवरचे उमेदवार जाहीर केले. आता राहिलेल्या जागांवर काँग्रेस आपले उमेदवार मैदानात उतरवू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, सांगलीच्या जागेवरून अजूनही संभ्रम कायम आहे. आता महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होते, हे पाहावे लागेल.

मविआचे जागावाटप अगोदरच झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले होते. परंतु, काही जागांवरील उमेदवार अजूनही घोषित करायचे राहिले आहेत. परंतु कोणती जागा कुणाला, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी पत्रकार परिषदेत केली जाऊ शकते. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, आम्ही सर्व एकजुटीने कामाला लागलो आहोत आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, हेच मंगळवारच्या पत्रकार परिषदेतून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

वंचितकडून अपेक्षाभंग

कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घ्यावे, असे तिन्ही प्रमुख पक्षांचे मत होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी प्रयत्न केले. विशेषत: काँग्रेस पक्षाने तर अखेरपर्यंत नवनवे प्रस्ताव देत फेरविचार करण्याचे आवाहन केले. परंतु, वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर वंचितचेही आव्हान असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकजूट फार महत्त्वाची मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in