शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला मोठ भगदाड पाडलं. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला १६ आमदारांना सोबत घेत बंड केलं. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्र घोषीत केलं होतं. त्याविरोधा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही त्यावर निकाल दिलेला नाही. आता मात्र, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय कधी देणार यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भाष्य केलं आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात सांगितलं की, निर्धारित वेळेत याबाबतचा निर्णय घ्यावा. लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक नियमांचे पालन करुन अपात्रतेचा आम्ही निर्णय देऊ," असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जून महिन्यात पक्ष कोणाकडे होता? हे पाहण्याच्या सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यावर आतापर्यंत कोणता निर्णय घेतला? याबाबत विचारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, "राजकीय पक्ष कोणता आहे, हे पहिल्यांदा आम्हाला पहावे लागेल. त्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व कोण करत आहे? पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेतृत्व योग्य आहे का? हे पाहुनच याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेताना घाई करणार नाही आणि विलंबही करणार नाही", असं देखील नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.