आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. त्याचे पडसाद सोमवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटल्याचे दिसून आले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

प्रतिनिधी/मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. त्याचे पडसाद सोमवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून सोमवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणबाजी केली. मात्र दरवेळी विरोधी पक्षाच्या आमदारांची जी संख्या असते ती यावेळी दिसून आली नाही.

विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘फसवणूक नको, आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ असे फलक हाती घेत सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, यासारख्या अनेक घोषणा यावेळी विरोधकांकडून देण्यात आल्या. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर, भाई जगताप, राजेश राठोड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा, विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली.

मनोहर जोशींसह राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी तसेच विधानसभा सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नार्वेकर यांच्याकडून या दिवंगत सदस्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. त्यानंतर यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. तर विधान परिषदेतही या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भातील शोक प्रस्ताव मांडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in