प्रभू श्रीराम मंदिराच्या विकासासाठी एक कोटींचा निधी ;खासदार हेमंत पाटील यांची पाचोंदा गावास भेट
नांदेड : प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना त्यांनी उनकेश्वर परिसरात वास्तव्य केले आहे. तेव्हापासून माहूर तालुक्यातील पाचोंदा या लहानशा गावात प्रभू श्रीरामचंद्राचे येथे एकमेव मंदिर आहे. रेणुका माता मंदिरापासून जवळच असलेल्या या तीर्थ स्थळाचा विकास करुन त्यास पर्यटनाचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी प्रभू श्रीराम मंदिराच्या विकासासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास निधीतून प्रवेश द्वार, तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण करून या तलावात प्रभू श्रीरामचंद्राची धनुर्धारी २० फुटाची भव्य दिव्य मूर्ती उभारण्यात येणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी (दि.२२) रोजी पाचोंदा येथे भेट देऊन परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने पाहाणी केली. या भेटीदरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक इंजिनिअर रोहित नादरे यांना बोलावून घेऊन प्रभू श्रीराम मंदिराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
पर्यटकांसाठी अधिकच्या निधीची गरज पडल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या विकासाचा गुणवत्ता पूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये तलावाचे सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, भव्य प्रवेशद्वार, स्वयपाकगृह, पार्किंग, सभामंडप, रस्ता रुंदीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे खासदार हेमंत पाटील यावेळी सांगितले.