त्यांच्या सुसंस्कृतपणाचा पाढा आम्ही एक दिवस वाचणार! गोगावले यांची तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

पालकमंत्रिपदावर वर्णी न लागल्याने नाराज झालेल्या भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.
सुनील तटकरे,  भरत गोगावले (डावीकडून)
सुनील तटकरे, भरत गोगावले (डावीकडून)
Published on

मुंबई : पालकमंत्रिपदावर वर्णी न लागल्याने नाराज झालेल्या भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. त्यावर राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना गोगावले यांनी, दुसऱ्यांनी आम्हाला सुसंस्कृतपणा सांगण्याची गरज नाही. एक दिवस त्यांच्या सुसंस्कृतपणाचा पाढा आम्ही वाचू, असा इशारा दिला. त्यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कारण आम्ही नियमाचे पालन करणारे लोक आहोत. आम्हाला एवढ्या मोठ्या मतांनी लोकांनी निवडून दिले. त्यामुळे कार्यकर्ते शिंदे यांच्याकडे त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. कारण गेल्यावेळी एकनाथ शिंदेंच्या एका इशाऱ्यावर आम्ही थांबलो. आता त्यांनी आम्हाला मंत्रिपद दिले, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्हालाही तारतम्य आहे. पण जे सुसंस्कृतपणाचे बोलले त्यांनी आधी हे पाहावे की आपण तीन आमदारांना जिंकून आणण्यासाठी की पाडण्यासाठी प्रयत्न केले. कारण जेव्हा त्यांची निवडणूक लागली तेव्हा आम्ही जीवाचे रान केले. सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत काम केले, असे भरत गोगावले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in