

कणकवली : निपाणी-देवगड या महामार्गावर फोंडा घाटामध्ये कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर बुधवारी येत असताना पलटी होऊन अपघात झाला.
हा अपघात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला. अपघात होताच टँकरने लगेचच पेट घेतला. या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे फोंडा घाटमधील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. याबाबत वृत्त असे की, सिंधुदुर्गात पेट्रोल घेऊन येत असताना पेट्रोल टँकरचालकाचा ताबा सुटल्याने फोंडा घाटमधील वळणामध्ये पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर लगेचच टँकरने पेट घेतल्यामुळे एकजण जळालेल्या अवस्थेत बाहेर फेकला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांचे पथक फोंडाघाट येथे दाखल झाले आहे. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, टँकरने पेट घेतल्यामुळे फोंडाघाट मार्ग बंद झाला असून कोल्हापूरच्या साईटला व सिंधुदुर्गच्या बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कारण करुळगाट सध्या बंद असल्यामुळे मोठी वाहतूक या फोंडाघाट मार्गाने सुरू आहे मात्र अनेक पर्यटकांना व वाहन चालकांना या अपघाताचा फटका बसला आहे.