अग्निवीर चाचणीदरम्यान अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना एकाचा मृत्यू

करण नामदेव पवार (वय- २०, राहणार- विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे
अग्निवीर चाचणीदरम्यान अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना एकाचा मृत्यू

अग्निवीर भरतीमध्ये नशीब अजमावण्यासाठी कन्नड तालुक्यातून दोन सख्खे भाऊ औरंगाबादेत आले होते. मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना अवघे पाच फूट अंतर बाकी होते तोच एक भाऊ मैदानात कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली.

करण नामदेव पवार (वय- २०, राहणार- विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले होते. रात्रीच्या वेळेत मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी करणने मैदानाचे तीन चक्कर पूर्ण केले होते. चौथे आणि शेवटचे चक्कर पूर्ण करण्यासाठी अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना करण अचानक मैदानात कोसळला. त्याला रात्री दीडच्या सुमारास तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून करणला मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आम्ही दोघेही भरती होण्यासाठी औरंगाबादेत आलो होतो. घरून आणलेली भाकर आम्ही दोघांनी सोबत खाल्ली. भाऊ म्हणाला होता की आपण दोघेही भरती होऊ आणि देशसेवा सोबत करू. पण शेवटच्या राउंडचे काही फूट अंतर शिल्लक होते. माझ्या डोळ्यादेखत माझा मोठा भाऊ गेला. मला आई नाही, वडील आजारी असतात. आता मी काय करू, असे मृत तरुणाच्या भावाने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in