राज्यात एक फूल दोन हाफ सरकार!

उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
राज्यात एक फूल दोन हाफ सरकार!

यवतमाळ : राज्यात एक फूल दोन हाफ सरकार आहे. एक पूर्ण मुख्यमंत्री आहे, तोही पूर्ण आहे का माहिती नाही. दोन हाफ उपमुख्यमंत्री आहेत. आमचं सरकार तीन चाकांचं म्हणून यांनी हिणवलं. आणि आता यांचं म्हणे त्रिशूळ सरकार. आमचं तीन चाकांचं सरकार असलं तरी लोकांची आम्ही कामं केली, म्हणून घरात बसूनही जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. तुम्हाला दारोदारी फिरुनही आशीर्वाद मिळात नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्य सरकारवर केली.

विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची रविवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे म्हणाले, ‘‘आता भाजपकडून फोडाफोडीचे जे धंदे सुरू आहेत, त्याबाबत मी काही गोष्टी एक-एक करत बोलत जाणार आहे. शिवसेना व भाजपला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे सूत्र त्यावेळी माझं आणि अमित शहांचं ठरलं होतं. हे मी याआधीही माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर सांगितलं आहे.’’ राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘राजकारणात फोडाफोडीचे प्रकार काही नवीन नाहीत, पण यापूर्वी पक्ष फोडला जात होता, मात्र आता पक्ष पळवला जात आहे. विशेष म्हणजे, पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत माझ्या ज्या काही सभा झाल्या, तसेच इथे येताना रस्त्यात जागोजागी लोक थांबलेले होते. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लोक येऊन सांगत आहेत की, जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा, पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, असे लोकच सांगत असल्याचे ठाकरे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिसांबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘याचा काहीही राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न केला, तर सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिला आहे, त्याच्या पलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत त्यांचा निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी त्या चौकटीच्या बाहेर निर्णय दिला तर ते लोकशाहीला धरून होणार नाही,’’ असेही ठाकरे म्हणाले.

जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे, पण आधी तो लोकांना समजावून सांगा. एक देश एक कायदा चालेल पण एक देश एक पक्ष होऊ देणार नाही,’’ असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील फुटीवर बोलताना ‘‘हे सध्या गद्दारांचं, लाचारांचं सरकार आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख गद्दारांचा महाराष्ट्र होऊन देणार नाही,’’ असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शब्द पाळला असता तर
फोडाफोडी करावी लागली नसती

‘‘आजही पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, २०१९ मध्ये अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री, असंच ठरलं होतं. त्याप्रमाणे अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर आज फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते, पण आज भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. भाजपचे जुने, ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांना आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांचा पाहुणचार करावा लागत आहे,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे

logo
marathi.freepressjournal.in