पुणे : जेवण करून शतपावली करण्यासाठी निघालेल्या तरुणावर किरकोळ वादातून धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. अल्पवयीन मुलांना तरुणाने मोबाइल मधील हॉटस्पॉट यंत्रणा वापरण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, एका तरुणाला अटक केली.
वासुदेव कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कुलकर्णी यांचे बंधू विनायक (वय ५२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मयूर भोसले याला अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी हे कुटुंबीयासह उत्कर्षनगर भागात राहायला आहेत. कुलकर्णी एका खासगी बँकेत कर्मचारी आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. उत्कर्षनगर परिसरातील पदपथावरून ते निघाले होते. त्यावेळी पदपथावर थांबलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणा वापरण्याकरिता मागितली. कुलकर्णी यांनी त्यांना नकार दिला. या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. अल्पवयीन मुलांनी कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले.