‘वन इलेक्शन'मुळे निवडणूक खर्चाला कात्री लागणार; पंतप्रधानांच्या संकल्पनेची एकनाथ शिंदेंनी केली प्रशंसा

लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिका, नगरपालिका आदी निवडणुकीतच आपण व्यस्त असतो. निवडणुकीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च होतात.
‘वन इलेक्शन'मुळे निवडणूक खर्चाला कात्री लागणार; पंतप्रधानांच्या संकल्पनेची एकनाथ शिंदेंनी केली प्रशंसा
एक्स @DrSEShinde
Published on

मुंबई : लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिका, नगरपालिका आदी निवडणुकीतच आपण व्यस्त असतो. निवडणुकीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च होतात. तसेच निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू होते आणि विकासकामांना ब्रेक लागतो. महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी 'वन नेशन, वन इलेक्शन' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना योग्य असून यामुळे निवडणुकीतील खर्चाला कात्री बसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी वृषाली शिंदे याही यावेळी उपस्थित होत्या. शिंदे यांनी नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आदी नेत्यांचीही दिल्लीत भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रातील मंत्रालयात मंत्री आपापल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आहेत. शिंदे अचानक मोदी, शहांच्या भेटीला गेल्याने राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दिली. महायुतीला जनतेने एकहाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला. विधानसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी वेळ दिला आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला संपूर्ण पाठिंबा दिला आणि यापुढेही केंद्र सरकारचा पाठिंबा कायम असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘टीम’ तीच मुख्यमंत्री बदलले!

अडीच वर्षं राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत होते आणि आम्हाला काय मिळाले यापेक्षा राज्याला काय देणार यावर लक्ष केंद्रित केले. आताही महायुतीने महाराष्ट्रातील जनतेला काय देणार यावर भर दिला आहे. आता ‘टीम’ तीच आहे, फक्त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे, असा मिश्किल चिमटा एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला.

logo
marathi.freepressjournal.in