‘एक व्यक्ती, एक पद’ व ‘एक कुटुंब, एक तिकीट’ काँग्रेसची महत्त्वपूर्ण घोषणा

‘एक व्यक्ती, एक पद’ व ‘एक कुटुंब, एक तिकीट’ काँग्रेसची महत्त्वपूर्ण घोषणा

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने व्यापक संघटनात्मक बदलाची घोषणा रविवारी केली. ५० वर्षांखालील तरुणांना पक्षात मोठे प्रतिनिधित्व देण्याबरोबरच ‘एक व्यक्ती, एक पद’ व ‘एक कुटुंब, एक तिकीट’ आदी महत्त्वपूर्ण घोषणा पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात रविवारी करण्यात आली. सततच्या होणाऱ्या पराभवातून चिंतन करण्यासाठी काँग्रेसने जोधपूरला नवचिंतन शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात पक्षाला उभारी देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.

काँग्रेसनेते राहुल गांधी यांची काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशव्यापी जनजागरण यात्रा यंदाच्या २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. तसेच आपण सत्तेत पुन्हा येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्षात व्यापक सुधारणाबाबत राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ. त्यांच्याशी आपले संबंध अधिक मजबूत करू. हे करताना कोणताही शॉर्टकट नसेल. यासाठी आपल्याला खूप घाम गाळावा लागेल. नेत्यांनी वैफल्यग्रस्त होऊ नये. कारण आपल्याला मोठी लढाई लढायची आहे.”

उदयपूरमध्ये काँग्रेसचे नवसंकल्प शिबीर सुरू आहे. या शिबिरात काँग्रेस २०२४च्या निवडणुकींना कसे सामोरे जायचे, या संदर्भात रणनीती ठरवणार आहे. याशिवाय काँग्रेसअंतर्गत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या शिबिरात नवसंकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी यांच्या पुढच्या वर्षभरात देशभरातल्या अनेक ठिकाणी जनजागरण यात्रा आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांच्या देशव्यापी जनजागरण यात्रेत बहुतांश ठिकाणी पदयात्रांचा समावेश असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

१०० मेळावे घेणार

काँग्रेस महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर देशभरात १०० ठिकाणी मेळावे आयोजित करणार आसल्याची माहिती आहे. तर, काँग्रेसमधील जी-२३ गटाच्या नेत्यांच्या मागणीनुसार काँग्रेसमध्ये भाजपच्या धर्तीवर संसदीय मंडळ तयार होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेते उदयपूर नवसंकल्प शिबिरात सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in