केंद्र सरकार तीन लाख टन कांदा खरेदी करणार; नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माफक समाधानकारक दर मिळण्यासाठी आणि कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून यावर्षी तीन लाख टन कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने सध्या रब्बी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १,४३५ रुपये दर जाहीर केला आहे.
केंद्र सरकार तीन लाख टन कांदा खरेदी करणार; नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया
Published on

हारून शेख/ लासलगाव

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माफक समाधानकारक दर मिळण्यासाठी आणि कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून यावर्षी तीन लाख टन कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने सध्या रब्बी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १,४३५ रुपये दर जाहीर केला आहे. तो सध्या बाजार समिती आवारात विक्री होत असलेल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या दरापेक्षा ७०० ते ७६५ रुपयांनी तर सरासरी दरापेक्षा १५० ते २०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे नाफेडच्या कांदा खरेदीचा कुठलाही फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार नसल्याचे शेतकरीवर्गात बोलले जात आहे.

केंद्र शासनाच्या कांदा खरेदीत असलेल्या जाचक अटी आणि कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा कल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच कांदा विकण्याकडे दिसत आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून गेल्या दीड महिन्यांपासून कांदा खरेदीसंदर्भात निविदा प्रक्रिया संपली. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र उशिराने कांदा खरेदी सुरू झाली असून केंद्राकडून कांदा खरेदीचा जो दर जाहीर करण्यात आला. तो बाजार आवारात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत स्पर्धात्मक नसल्याने कांदा उत्पादकांकडून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी खरेदीचे दर केंद्रीय खरेदीदार संस्था स्थानिक पातळीवर जाहीर करत होत्या.

गेल्या वर्षांपासून केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून हे दर निश्चित केले जात आहेत. या वर्षासाठी जाहीर केलेले दर व प्रत्यक्षात बाजार समितीत मिळणाऱ्या भावात मोठी तफावत आहे. नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करण्यासाठी प्रतवारी असलेल्या कांद्याचा निकष लाऊन खरेदी करण्याची अट आणि खुल्या बाजाराच्या तुलनेत कमी दर जाहीर करायचा यामुळे शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्याचे दिसत आहे. मुळात शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कांदा खरेदीचे उद्दिष्ट असताना कमी दराने कांदा खरेदी करून नेमका फायदा कोणाला द्यायचा? असा प्रश्न शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी विचारला आहे.

आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार दि.२१ रोजी कांद्याची किमान ७०० कमाल २२०० सरासरी१५८० रुपये क्विंटल दराने विक्री झाली होती. यंदा कांद्याचे उत्पादन ६३ टक्क्यांनी वाढले.

या हंगामात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असून, प्रति हेक्टर सरासरी २३.४ टन उत्पादन नोंदवले गेले. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सुमारे १० टक्के पर्यंत नुकसान झाले असले, तरीही हंगाम भरघोस राहिल्याने ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पुरवठा उपलब्ध राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

उन्हाळी कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टिकाऊ गुणवत्ता हा कांदा ६ ते ७ महिने कांदा चाळीत साठवून ठेवता येतो. शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने विक्री करता येते. सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल १५८० रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १५०० रुपयांपेक्षा किंचित जास्त आहे.

उत्पादन खर्च प्रतिक्विंटल सुमारे १८०० रुपये येतो. परंतु गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना १०५० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळे सरसकट तोटा सहन करावा लागत आहे. इतक्या कष्टाने पिकवलेला कांदा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे. उन्हाळ कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे जरी पुरवठा शाश्वत राहणार असला, तरी योग्य दर मिळत नसल्याने केंद्राने कांदा निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - भारत दिघोळे अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना

यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झालेले आहे. कांद्याचा पुरवठा व मागणीवर त्याचे दर ठरत असतात. पुरवठा प्रचंड झाल्याने बाजारपेठांमध्ये मागणी वाढलेली नाही. अपेक्षित दरवाढीच्या दृष्टीने उत्पादक कांदा साठवणूक केली जात आहे. कांदा दर स्थिर राहण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. - डी. के. जगताप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव

विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावर

नाशिक जिल्ह्यात यंदा २०२४-२५ या हंगामात उन्हाळ कांद्याचे उत्पादन ५९ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी वाढले आहे. मागील हंगामात (२०२३-२४) हे उत्पादन ३६ लाख टन होते. ही वाढ मुख्यतः लागवडीखालील क्षेत्रात आणि अनुकूल हवामान यांमुळे झाल्याचे राज्य कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in