
हारून शेख/लासलगाव
नववर्षाच्या सुरुवातीला लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात कांद्याच्या दरात सुधारणा होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्याने प्रतिक्विंटल तीन हजारांचा टप्पा पार केल्याने संपूर्ण आठवडाभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
डिसेंबरमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते. तथापि डिसेंबरच्या अखेरीस व नवीन वर्षाच्या सुरुवातीला दरात वाढ झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारावर सोमवार, ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या एक आठवड्यात कांद्याची २ लाख १४ हजार ३१९ क्विंटल आवक झाली. त्यात लासलगाव मुख्य बाजार आवारावर ८१,२६८ ट्रॅक्टर व पीकअप या वाहनातून एक लाख ४५ हजार ९९६ क्विंटल आवक झालेली आहे.
देशांतर्गत सर्वच बाजार समित्यांत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘बफर स्टॉक’च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा बाजारात आणला. त्यामुळे कांद्याच्या दरात २५०० रुपयांपर्यंतची मोठी घसरण झाली होती, तर कांद्याचे सरासरी भाव १५०० रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कांद्याच्या दरात एक महिन्यात अडीच हजार रुपयांनी घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना योग्य दर मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, असे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिले.
- विकाससिंह व ओमप्रकाश राका, कांदा निर्यातदार
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात कांद्याचे दर कोसळणार नाहीत. यासाठी कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द होणे गरजेचे आहे.
- प्रवीण कदम, कांदा निर्यातदार