कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार!

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निवडणूक काळात काही अटी-शर्तीवर ती बंदी उठविली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत...
कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार!

हारुन शेख/लासलगाव

कांद्याचे दर क्विंटलला ४,२५२ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांदा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निवडणूक काळात काही अटी-शर्तीवर ती बंदी उठविली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत कांद्याच्या दरात वाढ झाली. बाजारपेठेत दोन आठवड्यांत कांद्याचे भाव ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. आगामी बकरी ईदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांत कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे. मात्र, सरकार लवकरच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलू शकते, असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करत असल्याचे बोलले जात आहे

६०० रुपयांनी कांदा दरात वाढ

लासलगाव बाजार समितीत एक जून रोजी कांद्याची किमान ६०० रुपये, कमाल २,२०० रुपये, सरासरी १,९५० रुपये क्विंटल दराने विक्री झाली होती. दोन आठवड्यानंतर शुक्रवारी कांद्याची किमान ८००, कमाल २,७८५ तर सरासरी २,५५० रुपये दराने विक्री झाली आहे. दोन आठवड्याच्या तुलनेत किमान दरात २००, कमाल व सरासरी दरात ६०० रुपये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

कांदा खरेदी दर ठरविण्याचे अधिकार नाफेडऐवजी ‘डोका’ला मिळाले. त्यांनी चालू आठवड्यासाठी २,१०० रुपये प्रति क्विंटल दर ठरवला. मात्र, बाजारभावापेक्षा हा दर किमान पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफच्या खरेदीकडे पाठ फिरवली. मात्र, पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता नाफेडच्या संचालकांनी व्यक्त केली असून तसा पत्रव्यवहारही संबंधित यंत्रणेशी केला आहे. त्यामुळे आता येत्या सोमवारी कांद्याचे वाढीव खरेदी दर मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहील.

नाफेड खरेदी केंद्रांवर बाजारभावाप्रमाणेच कांद्याला वाढीव भाव मिळावेत आणि पूर्वीप्रमाणेच हे भाव रोज ठरावेत यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून याआधी लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील तीन दिवसांच्या बाजारभावांची सरासरी काढून नाफेड कांदा खरेदीचे दर ठरवत असे. मात्र, आता हे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे गेल्याने संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांतील दराचा आढावा घेऊन भाव ठरविले जात आहेत. - केदा आहेर, संचालक नाफेड

logo
marathi.freepressjournal.in